शहरात चौकातील सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांकडून पैसे उकळून त्रास देत असल्याचे वृत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने नुकतेच दिले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी समाजिक सुरक्षा विभागाला चौकात वाहनचालकांकडे पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच, काही वाहनचालकांनी तृतीयपंथींच्या त्रासाबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.
पुणे-सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता तसेच शहरातील महत्वाच्या चौकात थांबलेल्या तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांची अडवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आले होते. उपनगरातील चौकात असे प्रकार वाढल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सिंग यांनी सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौक, हडपसर येथील लोणी टोलनाका, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक, सारसबागेसमोरील चौक, पौड रस्त्यावरील करिश्मा सोसायटी चौक येथे कारवाई केली. नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या १३ तृतीयपंथीयांविरोधात महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम ४ (१) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. या कारवाईनंतर चौकातून तृतीयपंथी गायब झाल्याचे दिसून आले. दमदाटी करून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच, सामाजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई सुरूच राहणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times