नवी दिल्ली, : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि ते पुन्हा विराट कोहलीकडे देण्यात आले. यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत आपले मत नेमके काय आहे, याबाबत अजिंक्यने सांगितले आहे.

याबाबत अजिंक्य म्हणाला की, ” भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याबाबत माझ्यामध्ये आणि विराट कोहलीमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. कारण जेव्हा विराट कोहली कर्णधार असतो तेव्हा भारतीय संघाला कसा विजय मिळवून देता येईल, हेच त्याचे ध्येय असते. त्याचबरोबर जेव्हा मी भारताचे नेतृत्व सांभाळतो तेव्हा माझ्या मनामध्ये हीच भावना असते. कर्णधार कोणीही असला तरी भारतीय संघाला विजय मिळवून देणे हे सर्वात महत्वाचे आहे, असे मला तरी वाटते.”

अजिंक्य पुढे म्हणाला की, ” इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहली भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवणार आहे आणि माझ्याकडे उपकर्णधारपद असेल. यावेळीही आमच्यामध्ये कोणतीच स्पर्धा नसेल. आम्हा दोघांसाठीच भारतीय संघाने विजय मिळवणे हीच महत्वाची गोष्ट आहे. त्या एका ध्येयासाठीच आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे संघाचे नेतृत्व कोणाकडे आहे आणि त्यामध्ये काय बदल होत आहे, यापेक्षा संघभावना सर्वात महत्वाची आहे, असे मला तरी वाटते. त्यामुळे कर्णधारपदाबाबत माझ्यात आणि विराटमध्ये कोणतीच स्पर्धा नाही.”

रिषभ पंतच्या खेळीबाबत अजिंक्य नेमकं काय म्हणाला, पाहा…ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने अविस्मरणीय खेळी साकारली. पंतच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला विजयावर शिक्कामोर्तब करता आले. पंतच्या या खेळीबाबत अजिंक्य म्हणाला की, ” आम्ही पंतला फक्त एकच गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे तु नैसर्गीक खेळ करत राहा. बाकी कोणत्याही गोष्टींचा तु विचार करू नकोस. पंतने तिच गोष्ट केली आणि त्यामुळेच आम्हाला अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला.” आज तक वाहिनीला अजिंक्यने आपली मुलाखत दिली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here