चेन्नईतील आशिषकुमार या तरुणाशी डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर महिलेने त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पुण्याला बोलावले. येथील एका हॉटेलात खोली बुक केल्यानंतर तिथे त्याच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून ते प्यायला दिले. बेशुद्ध झाल्यानंतर तिने तरुणाकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही महिला कैद झाली होती.
या प्रकरणी आशिषकुमारने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. एका डेटिंग अॅपवरून ओळख झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला हॉटेलच्या परिसरात येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या मोबाइल लोकेशनवरून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘ मिरर’ला सांगितले की, आरोपी महिलेने शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि तरुणाला प्यायला दिले. तरूण बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्याकडील दागिने, मोबाइल आणि रोकड असा ऐवज घेऊन ती पसार झाली. या संशयित महिलेने अशा प्रकारे अनेकांना लुटल्याची शक्यता आहे. तिने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times