मुंबई: कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह २२ नव्या जिल्ह्यांची आणि ४९ नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नवे जिल्हे आणि तालुक्यांची भर पडणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २०१८मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने २२ नवे जिल्हे आणि ४९ नवे तालुके निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. या समितीने लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचं त्रिभाजन करण्याची शिफारसही केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जव्हार, मालेगाव जिल्हा होणार

ठाणे जिल्ह्यातून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण आणि मीरा-भाईंदर हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात येणार आहे. पालघरमधून जव्हार जिल्ह्याची निर्मितीचीही शिफारस करण्यात आली आहे. तर नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातून पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून साकोली, चंद्रपूरमधून चिमूर, गडचिरोलीतून अहेरी, जळगावमधून भुसावळ, लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नांदेडमधून किनवट, सातारा जिल्ह्यातून माणदेश, पुण्यातून शिवनेरी, रत्नागिरीतून मानगड आणि रायगडमधून महाड आदी जिल्हे निर्माण करण्याची शिफारस या समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here