म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) या संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये म्युच्युअल फंडांचे ७२ लाख नवीन फोलिओ सुरु झाले. २०१९ मध्ये ६८ लाख नवीन फोलिओ सुरु झाले होते. दरम्यान एक गुंतवणूकदार एकापेक्षा अनेक फोलिओ सुरु करु शकतो.
अॅम्फीच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२०च्या अखेरीस ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांची एकूण फोलिओ संख्येत ७२ लाखांची भर पडली आणि ती ९.४३ कोटी झाली. डिसेंबर २०१९ अखेर देशातील एकूण म्युच्युअल फंड फोलिओ ८.७१ कोटी होते.
करोना संकटाने सर्वांना असुरक्षित केले. त्यामुळे जे पहिल्यापासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत होते त्यांनी त्यात आणखी वैविध्य आणले. तर गेल्या वर्षभराच्या करोना संकटकाळात देखील नव्याने म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करणारे गुंतवणूकदार देखील पाहायला मिळाले, असे मत मायवेल्थग्रोथडॉट कॉमचे सह संस्थापक हर्षद चेतनावाला यांनी सांगितले. गेल्या वर्षात भांडवली बाजारात झालेली मोठी घसरण आणि त्यानंतर झालेली वाढ यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, म्युच्युअल फंड उद्योगातील डिजिटल सेवांमुळे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. झटपट ऑनलाइन प्रक्रियेमुळे म्युच्युअल फंडाचे खाते सुरु करणे सोप्प झाले आहे.त्याचाही परिणाम म्युच्युअल फंडाचे फोलिओ वाढण्यात झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times