गेल्या आठवड्यात शुक्रवारी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. यात रिलायन्स इंडस्ट्रीजला १३१०१ कोटींचा एकूण नफा मिळाला. गतवर्षाच्या याच तिमाहीचे तुलनेत यंदा नफ्यात १२.५ टक्के वाढ झाली होती. मात्र तरीही बाजारात गुंतवणूकदारांनी रिलायन्सच्या शेअरची विक्री केली.
सोमवारी सेन्सेक्समध्ये ५३० अंकांची घसरण झाली. निफ्टी १३३ अंकांनी कोसळला होता. यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सपाटून मार खाल्ला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सोमवारी सकाळी ४.५२ टक्क्यांच्या घसरणीसह १९५७ रुपयांपर्यंत खाली घसरला होता. जाणकारांच्या मते कंपनीने करोना संकटात देखील चांगली कामगिरी केली आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार येत्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २१ टक्क्यांनी वाढू शकतो.
नोमुरा या ब्रोकरेज संस्थेने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे उद्दिष्ट २४०० रुपये ठेवले असून शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. क्रेडीट सूस या संस्थेने मात्र रिलायन्सचे टार्गेट १९३० रुपये ठेवले असून खरेदी किंवा विक्रीची शिफारस न करता तटस्थ भूमिका घेतली आहे. किरकोळ व्यापारातील विक्रीचे आकडेवारी, जिओ ग्राहकांची संथपणे वाढणारी संख्या यामुळे रिलायन्सला डिसेंबरच्या तिमाहीत फारसे काही करता आले नाही, असे क्रेडीट सूसने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
वाचा :
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने रिलायन्स इंडस्ट्रीजचे टार्गेट २३२५ रुपये ठेवले असून ग्राहकांना खरेदीचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. कोटकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे टार्गेट २०५० रुपये ठेवले आहे. एडलवाइज सिक्युरिटीजने २१०५ रुपये टार्गेट प्राईस ठेवली असून प्रभुदास लीलाधर या शेअर ब्रोकिंग कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची टार्गेट प्राईस २२३२ रुपये ठेवली आहे. या दोन्ही संस्थांनी शेअर खरेदी करावा, असा सल्ला दिला आहे.
‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने रिलायन्सचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी एचडीएफसी सिक्युरिटीजने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरसाठी २३३० रुपये उद्दिष्ट ठेवले आहे. आयडीबीआय कॅपिटलने रिलायन्सचा शेअर २४७५ रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करून शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times