प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला काल हिंसक वळण लागले. आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. त्यात मोठ्या संख्येने पोलीस व आंदोलक जखमी झाले. या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘संयमाने आंदोलन केल्यानंतर जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकारनेही संयमी भूमिकेतून आंदोलन हाताळायचे असते. पण तसे घडताना दिसत नाही. संबंध देशाला अन्न पुरविणारा घटक जेव्हा एखादी मागणी करतो तेव्हा त्यावर विचार व्हायला हवा होता. प्रतिबंध घातल्याने वातावरण चिघळताना दिसत आहे. दिल्लीत २० ते २५ हजार ट्रॅक्टर येतील, हे माहीत होते. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करून हे वेळीच थांबवायला हवे होते. मात्र त्यांची दखल घ्यायचीच नाही, हे ठरविल्यामुळे असे झाले. दिल्लीत आज जे घडत आहे, त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण वातावरण का बिघडले याचा विचार करायला हवा,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.
‘कृषी कायद्याविषयीची चर्चा २००३ पासून सुरू आहे. माझ्याकडे कृषी खात्याची जबाबदारी असतानाही ही चर्चा सुरू होती. सर्व राज्यांच्या कृषी व पणन मंत्र्यांच्या बैठकीत आणि माझ्या उपस्थितीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती. नंतर निवडणुका झाल्या. नवीन सरकार आले आणि हा विषय मागे पडला. केंद्र सरकारने तीन कायदे संसदेत मांडले. कायदे मांडण्याला विरोध नाही. सिलेक्ट कमिटीकडे कायदे पाठवावेत. तिथं चर्चा करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने थेट कायदे मांडून गोंधळात मंजूर करून घेतले. तेव्हापासूनच मला वाटत होते, याची कधीना कधी प्रतिक्रिया उमटणारच,’ असंही पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times