मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिल्लीतील आंदोलनावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी मुंबईतील आझाद मैदानातील मोर्चावरही टीका केली आहे. ‘आझाद मैदानातील शेतकरी मोर्चात भेंडी बाजारातील महिला कशा?,’ असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

वाचा:

‘दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांचं असूच शकत नाही. शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन पेटवू शकत नाहीत. लोकांच्या पोटाची भूक भागवणारा शेतकरी आंदोलन पेटवण्याची भाषा करू शकत नाही. या आंदोलनामागे देशविघातक शक्ती आहेत. या आंदोलनाचा बोलविता धनी वेगळाच आहे,’ असं दरेकर यांनी काल म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनी कडवट प्रतिक्रिया दिली होती. शेतकरी आंदोलनाबाबतचं दरेकरांचं वक्तव्य ऐकून मला लाज वाटली. एकेकाळी मी देखील विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होता. या पदावरच्या नेत्यानं असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असं पवार म्हणाले होते.

वाचा:

पवारांच्या या टीकेला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. पण मी नेहमी माझ्या पदाचं भान ठेवून बोलत आलोय. आधार असल्याशिवाय मी कुठलंही वक्तव्य करत नाही. आझाद मैदानातील मराठा आंदोलकांना भेटायला गेलो होतो तेव्हा मला शेतकरी मोर्चाला येत असलेल्या महिला दिसल्या. सहज चौकशी केली तेव्हा त्या भेंडी बाजारातून आल्या आहेत असं कळलं. भेंडी बाजारात कुठून शेती आली? तिथं शेतकरी कुठून आला? मी केवळ वस्तुस्थिती मांडली. ती कोणाला आवडत नसेल तर तो आमचा दोष आहे का?,’ असा प्रतिप्रश्न दरेकर यांनी केला.

‘शाहीन बागच्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही व्यक्ती आझाद मैदानातील मोर्चातही फिरताना दिसल्या. हे सगळं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काळजीचं आहे. एखाद्या आंदोलनात कोणी घुसखोरी करत असेल आणि ते आम्ही निदर्शनास आणत असू तर विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही चुकीचे कसे?,’ असा प्रश्नही दरेकर यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here