ठाणे: ठाण्यातील वर्तक नगरमधील पोखरड रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानावरील दरोड्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांनी ज्वेलर्स शॉपला लागून असलेला गाळा भाड्याने घेतला. तिथे फळविक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर गॅस कटर आणि ड्रिलिंग मशीनच्या मदतीने भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्समधील कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्वेलर्समध्ये चोरी करणारा आरोपी हा मूळचा झारखंडचा राहणारा आहे. ‘चोरट्यांनी आधी वर्तक नगरच्या पोखरण रोडवरील वरिमाता ज्वेलर्सच्या परिसराची रेकी केली. ज्वेलर्सच्या बाजूचा गाळा रिकामा असल्याचे चोरट्यांना समजताच, त्यांनी मालकाकडून तो भाड्याने घेतला. त्यानंतर तिथे फळविक्रीचे दुकान सुरू केले. चोरट्यांनी गॅस कटर आणि ड्रिलिंग मशिनच्या साह्याने भिंतीला भगदाड पाडले.’

राहुल अब्दुल माजिद शेख असे गाळा भाड्याने घेणाऱ्याचे नाव आहे. त्याने दुकान भाड्याने घेऊन तिथे फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. १७ जानेवारीला रात्री राहुलने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने दुकानातील भिंतीला भगदाड पाडले आणि ज्वेलर्समधील कोट्यवधींचे दागिने घेऊन पसार झाले. पोलिसांना राहुल आणि त्याचा साथीदार साहेब अकबर शेख यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील दागिने जप्त केले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. उर्वरित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here