शिंदखेडा येथे राहणारा हर्षल आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. करोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांपासून तो जळगाव शहरातील तुकारामवाडीत त्याचे मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. दीपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. आज मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते. तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली होती. त्या दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तुकारामवाडीतील काही नागरिकांनी हर्षलला तातडीने सुरुवातीला खासगी रुग्णालयात, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल याच्याकडे मोबाइल होता. मोबाइलमध्ये त्याने वेबसाइट ओपन करून पाहिली आहे. या वेबसाइटवर त्याने मृत्यूबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे.
एकुलता एक मुलगा
मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. एकुलता एक असलेल्या हर्षलच्या हट्टापायी आईने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times