म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्रातील काही नेते आम्ही मुस्लिमांच्या आग्रहावरुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याचा दावा करतात. पण अशा मंडळींनी मोदीसारखे बोलता कामा नये. तेलंगणा व अन्य राज्याप्रमाणे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बोलावून खास प्रस्ताव संमत करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या त्या काळ्या कायद्याच्या विरोधात प्रस्ताव मंजूर करण्याचे धाडस दाखवावे अशी मागणी एमआयएमचे नेते यांनी मंगळवारी एका जाहीर सभेत बोलताना केली.

भारतीय राज्यघटना वाचविण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकास राज्यघटनेने मुलभूत हक्क व अधिकार दिले असून, त्यात धर्म स्वातंत्र्यसुद्धा आहे. मी मुस्लिम असून मरेपर्यंत मुस्लिम राहील. या देशाचा रक्षक म्हणून काम करील. हे राष्ट्र वाचविण्यासाठी आणि गांधीवादी मूल्ये अबाधित राखण्याचा हा संघर्ष आहे. आज आम्हांला भाजप छोडो असा नारा द्यावा लागेल. देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात सीएए आणि एनआरसीसारखा काळा कायदा आजतागायत संमत झाला नव्हता. देशाची घटना आणि गांधी आंबेडकर यांचे विचार अबाधित ठेवण्यासाठी महिलांसुद्धा रस्त्यावर उतरत आहेत असे ओवेसी यांनी सांगितले.

धर्माच्या नावाखाली स्वतंत्र राष्ट्र करण्याचा महंमद अली जिना यांचा इरादा आम्ही मोडून काढला. मोदी या देशाचा महान वैचारिक वारसा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील २८ टक्के लोकांकडे जन्माचे दाखले नाहीत. त्यात ४० टक्के मुस्लिम आहेत हे सरकारी यंत्रणेचे आकडे आहेत. आज आम्ही या कायद्याला विरोध केला नाही तर उद्या आमचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. मुंबईतील १९९२च्या दंगलीत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांना न्याय मिळाला नाही. श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याचा आरोप करुन. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या त्या काळ्या कायद्याच्या विरोधात विधानसभेत ठराव मंजूर करावा अशी मागणी ओवेसी यांनी केली.

व्हाईस ऑफ इंडियाच्या पुढाकाराने झुला मैदानात झालेल्या या सभेत ओवेसी यांच्याशिवाय खा. इम्तियाज जलील, वारिस पठाण, आ. कपिल पाटील, नसीम सिद्दीकी यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here