निर्भया प्रकरणातील एक दोषी मुकेशकुमार सिंहची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली असून त्याला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी आजच पूर्ण झाली असून यावर उद्या बुधवारी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देणार आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने तिहार कारागृह प्रशासनाकडे आज फाशीबाबत विचारणा केली. सत्र न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीची कोणती तारीख निश्चित केली आहे? डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का?, असे प्रश्न सुप्रीम कोर्टाकडून तिहार कारागृहाला विचारण्यात आले असून त्यावर कारागृह प्रशासन उद्या बुधवारी उत्तर देणार आहे.
…
दरम्यान, निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही फाशी देण्यात येणार असून फाशी टाळण्यासाठी दोषींची विविध मार्गांनी धडपड सुरू आहे.
निर्भया प्रकरणाने हादरला होता देश
निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३ वर्षीय निर्भयाला धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. या अमानुष कृत्यानंतर बसमधून पीडितेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. निर्भयाला अधिक उपचारासाठी सिंगापूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तिथे २९ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times