पारनेरचे पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप यांच्या पथकाने ही कारवाई केली. विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे (वय ५५) यांच्यावर तलवार, काठ्यांनी हल्ला झाला होता. यामध्ये अमोल कर्डीले हा प्रमुख आरोपी होता. त्याच्याविरूद्ध पारनेर आणि शिरूर तालुक्यात विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत आरोपी कर्डीले यांचे चुलते अनिल कर्डीले यांच्या विरोधात जयवंत नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी माघार घ्यावी यासाठी अमोल व त्याचे साथीदार नरवडे यांना दमदाटी करून दबाव आणत होते. मात्र दबाव झुगारून नरवडे यांनी निवडणूक लढविली. मात्र, यामध्ये अनिल कर्डीले विजयी झाले, तर नरवडे पराभूत झाले. तरीही कर्डीलेचा राग गेला नव्हता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी कर्डीले साथीदारांसह नरवडे यांच्या घरी गेला. त्यांना घरातून बाहेर ओढून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या इतरांना अविनाश निलेश कर्डीले याने पिस्तुल दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पसार झाले. यातील आकाश कर्डीले व रमेश नरवडे यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्हयातून विवेक उर्फ पिटया कर्डीलेसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. मात्र मुख्य आरोपी अमोल कर्डीले, अनिल कर्डीले यांच्यासह इतर आरोपी फरार होते.
अमोल कर्डीले शिरूर तालुक्यातील निमोणे भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस तेथे गेले. आरोपींचा शोध सुरू असताना बुधवारी सायंकाळी अमोल कर्डीले चव्हाणवाडी फाटा (निमोणे ता. शिरूर) शिवारात एका शेतात दारू व मटण पार्टी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तेथे एक कार उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांना पाहून आरोपी कर्डीले याने पार्टी सोडून धूम ठोकली. तो उसाच्या शेताच्या दिशेने पळाला. पोलिसही त्याच्या मागे धावले. पाठलाग सुरू असतानाही तो तेथून सटकण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर पोलीस निरीक्षक बळप यांनी गोळ्या घालण्याचा इशारा दिल्यानंतर कर्डीले पोलिसांना शरण आला. त्याला पकडून पारनेरला आणण्यात आले. पारनेरसह शिरूर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times