नोएडाः शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून आंदोलकांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक पत्रकारांवर देशद्रोहासह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाला, अशी अफवा प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी पसरवली गेली. यानंतर आंदोलनकर्ते अधिक हिंसक झाले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली.

दिल्लीत २६ जानेवारीला हिंसा भडकवणं आणि पोलिसांनी आंदोलन करणार्‍या एका शेतकर्‍याची गोळ्या घालून हत्या केल्याचं वृत्त ट्वीट केल्या प्रकरणी कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई, नॅशनल हेराल्ड समूहाचे संपादकीय सल्लागार मृणाल पांडे, जफर आघा, परेशनाथ, अनंतनाथ, विनोद के जोसे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशद्रोहासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल

या प्रकरणी गौतम बुद्ध नगर पोलिसांनी देशद्रोह, हिंसा भडकवणे, हिंसाचार पसरवणे आणि आयटी कायद्यातील कलम यासह अनेक गंभीर कलमांमध्ये एफआयआर नोंदवला आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भरधाव ट्रॅक्टर चालवत असलेला हा शेतकरी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्ट तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. पण त्यात ट्रॅक्टर पलटी झाला आणि ट्रॅक्टर खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

काय होते संपूर्ण प्रकरण?

दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ठार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण शेतकऱ्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणातील सत्य उघड झाले. शेतकऱ्याचा पोलिसांच्या गोळीने नाही तर ट्रॅक्टर उलटून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, असं समोर आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here