चीनमध्ये विषाणूचा उद्रेक झाल्यनंतर जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांसारख्या अकरा देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदवले आहे. करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी केंद्रसरकारच्या मदतीनेही महाराष्ट्रात काही ठोस उपाययोजना राबण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. २७ जानेवारीपर्यंत मुंबई विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून त्यातील १८ प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. मुंबईतील पाच प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्यामुळे आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी तीन प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे एनआयव्ही या संस्थेने कळवले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात दोन प्रवाशांना तर नांदेड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका प्रवाशास भरती करण्यात आले आहे. अद्याप राज्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सरकारी यंत्रणा सज्ज
महाराष्ट्रात करोना विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्व तयारी केली आहे. ‘करोना’रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. करोना आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये आंतरविभागीय समन्वयाची नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चीनमध्ये शैक्षणिक कारणांसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्याच्या दृष्टीनेही केंद्र सरकारडून निर्देश देण्यात येणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times