म. टा. प्रतिनिधी । मुंबई

कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या २५ रुपयांच्या रोजच्या प्रवासाला आज २५० रुपयांहून अधिक खर्च होत आहे. ५०-६० हजार रु. पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलमुभा आणि १२-१५ हजार रुपये पगार असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. खासगी कर्मचारी असणे ही सामान्यांची चूक आहे का? असा सवाल सामान्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबईतील अधिकृत हातगाड्यांवरील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मोबाइल मार्केटमधील दुकानदार, रेल्वे स्थानकांच्या बाहेर भेळ विकणारा, चौपाटीवर पाणीपुरीची गाडी लावणारा हे देखील मुंबईतीलच महत्त्वाचे घटक आहेत. यांना प्रवासासाठी लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आहे. किमान स्वस्त प्रवासाची सुविधा देत त्यांना रोजगाराचे मार्ग मोकळे करण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे आहे. मर्यादित बसफेऱ्या, तीन ते चार तासांचा रस्ते प्रवास यांमुळे कामगार वर्गाचे प्रवासहाल कायम आहे. महिन्याकाठी २० हजार रु.पेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यांमुळे घर चालवायचे? मुलांचे शिक्षण करायचे, की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

८० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या लोकल फेऱ्यामधून सध्या सरासरी १९ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. ६१ लाख प्रवासी राज्य सरकारच्या स्पष्ट निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. श्रेयासाठी राजकीय नेते लोकल सुरू करण्याची आश्वासने देतात ,मात्र ती आतापर्यंत पोकळच ठरली आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास लोकलमधील गर्दीत वाढ होईल. परिणामी नियंत्रणात आलेला करोना संसर्ग बळावेल, या निष्कर्षाप्रत येऊन राज्य सरकारकडून प्रवास परवानगी नाकारण्यात येत आहे. एसटी-बेस्टसह मॉल, हॉटेल, डिस्को-पब, वाइनशॉप अशा सर्वच ठिकाणी गर्दी कायम आहे. यामुळे सामान्यांवरील लोकलबंदी हटणार केव्हा याकडे तमाम प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

लोकल का हवी?

लोकल ही मुंबईकरांची व पर्यायाने मुंबईची जीवनवाहिनी. करोना संसर्गाच्या काळात लोकल बंद झाल्या. पुढे ती बंधने घालून घेत धावू लागली. मात्र, अजूनही सर्वांसाठी लोकलची दारे खुली झालेली नाहीत. तुम्हाला रोजच्या प्रवासात कोणत्या समस्या येतात, लोकलबंदीमुळे तुमच्या आर्थिक, वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यात कोणते अडथळे निर्माण झाले ते ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे matapratisad@gmail.com या ईमेलवर कळवा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here