म. टा. प्रतिनिधी,
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कर्जत तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर चौथी मार्गिका, कल्याण-मुरबाड नवा रेल्वे मार्ग, कल्याण रेल्वे यार्डाचे रिमॉडलिंग… गेली अनेक वर्षांमध्ये रेल्वेच्या या नियोजित प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू आहेत. दुसरीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी नवी रेल्वे स्थानके, होम प्लॅटफॉर्म, रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल, सरकते जिने आणि वाढीव शटलसेवा आवश्यक आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासी क्षमता वाढवणाऱ्या प्रकल्पांना भरघोस तरतुदीची अपेक्षा रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात ठाण्यातील खासदारांची भेट घेऊन प्रवासी संघटनांकडून या प्रलंबित प्रकल्पांसाठी आग्रह धरला आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी या संदर्भात ठाणे जिल्ह्यातील खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना रेल्वे अर्थसंकल्पामध्ये प्रवासी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भरघोस तरतुदींचा आग्रह धरला आहे. भाजप खासदार कपिल पाटील यांची भेट घेऊन रेल्वे मंत्र्यांकडून ठाणे जिल्ह्यासाठी व्यापक स्वरूपात नव्या प्रकल्पांची मागणी नोंदवली. रखडलेल्या मार्गिकांची कामे मार्गी लावत असताना नव्या मार्गिकांच्या निर्मितीलाही प्राधान्य देण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली. नवी रेल्वे स्थानकांची घोषणा झाली असली तरी त्यांना मंजुरी आणि आवश्यक आर्थिक मदतीचीही मागणी करण्यात आली.

रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या

ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गीका, दिवा-वसई उपनगरीय रेल्वे सेवा, कल्याण-कसारा, कल्याण कर्जत तिसरी चौथी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत लिंक मार्गिका, कर्जत-पनवेल दुसरी मार्गिका यांसारख्या रखडलेल्या प्रखल्पांची कामे लवकर व्हावी, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने विशेष झोन घोषित करण्यात यावे, याशिवाय नव्या घोषणा करण्याऐवजी रखडलेले हे प्रकल्प मार्गी लावण्यात यावे, अशी अपेक्षा मनोहर शेलार यांनी व्यक्त केली.

शटल सेवांची अपेक्षा

मध्य रेल्वेच्या ठाण्यापर्यंत प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांसाठी शटल सेवा सुरू करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रवासी संघटनांकडून केली जात असून कर्जत, कसारा, कल्याण आणि इतर स्थानकांतून ठाण्यापर्यंत मोठ्या संख्येने शटल सेवा सुरू करणे आवश्यक आहे. महिला विशेष लोकलची संख्या वाढवणे, पंधरा डब्यांच्या लोकल कल्याणपलीकडच्या स्थानकांमध्ये सुरू करणे, यासारख्या मागण्याही पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया राजेश घनघाव यांनी व्यक्त केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here