इस्लामाबाद: बासमती या तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा भौगोलिक निदर्शक शिक्का (जीआय टॅग) पाकिस्तानला मिळाला आहे. यामुळे बासमती तांदळाचे मूळ स्थान म्हणून यापुढे पाकिस्तानचा उल्लेख होईल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बासमती तांदळाच्या मालकीबाबत युरोपीय समुदायाकडे दावा केला होता. लांब दाण्याचा व विशिष्ट गंध असलेला बासमती तांदूळ केवळ भारतातच पिकवला जातो, असा भारताचा दावा होता. त्याला त्या वेळी पाकिस्तानने डिसेंबरमध्ये आव्हान दिले होते.

बासमतीची नोंदणी पाकिस्तानी तांदूळ अशी व्हावी, यासाठी पाकिस्तानने भारताविरोधात २७ सदस्यीय युरोपीय संघामध्ये दावा दाखल केला आहे. जागतिक बाजारात कोणतेही उत्पादन नोंदवण्यासाठी त्या उत्पादनाची नोंदणी प्रथम संबंधित देशाच्या जीआय कायद्यांतर्गत होणे गरजेचे असते. बासमतीला पाकिस्तानच्या नावे जीआय टॅग मिळाल्याची घोषणा पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी मंगळवारी ट्विट करून केली. जीआय टॅग मिळाल्यामुळे पाकिस्तानी उत्पादनांची नक्कल करण्यापासून रोखता येणे शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले. सध्या दर वर्षी पाकिस्तानातून पाच लाख ते सात लाख टन बातमती तांदूळ जगभरात निर्यात केला जातो. यापैकी दोन लाख ते अडीच लाख टन तांदूळ युरोपीय संघाला निर्यात केला जातो.

वाचा:
प्रकरण काय?

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतातर्फे बासमती तांदळावर मालकी सांगणारा अर्ज युरोपीय संघाकडे करण्यात आला होता. लांब दाण्याचा हा तांदूळ उत्तर भारतात, हिमालयाच्या पायथ्याशी, गंगेच्या पठारी प्रदेशात पिकवला जातो. त्यामुळे याचे मूळ भारतात आहे, असा दावा भारतने केला होता. या दाव्याला डिसेंबर २०२०मध्ये पाकिस्तानने आव्हान दिले होते. बासमती तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, असे पाकिस्तानचे म्हणणे होते.

वाचा:
जीआय टॅग म्हणजे काय?
विशिष्ट भौगोलिक प्रदेशात मूळ असलेल्या पदार्थांना, पिकांना त्या प्रदेशाची ओळख मिळावी यासाठी भौगोलिक निदर्शक शिक्का (जीआय टॅग) दिला जातो. जीआय टॅग मिळाल्यामुळे त्या पदार्थाची, पिकाची गुणवत्ता आणि महत्ता ही त्या प्रदेशाशी कायमची जोडली जाते.

वाचा:
व्यापारावर परिणाम नाही
भारताच्या बासमती तांदळाच्या व्यापारावर याचा विशेष परिणाम होईल असे वाटत नाही. उद्या पाकिस्तानी बासमती आपल्याकडे विक्रीसाठी आला तरी ग्राहक दोन्ही बासमतीची गुणवत्ता तपासून पाहील आणि मग कोणता बासमती खरेदी करायचा ते ठरवेल. तात्कालिक परिणाम दिसून येईल, पण दीर्घकालीन परिणाम होणार नाही असे शेतकरी संघटना न्यासाचे अध्यक्ष गोविंद जोशी यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here