म. टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रजासत्ताक दिनी शहरातील रस्त्यांसह वंजारीनगर उड्डाणपुलावर ( ) करणाऱ्या युवकांचे परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत अशी कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक परिवहन विभागाने या युवकांना बजावली आहे. त्यामुळे आरटीओ या युवकांचे परवाने रद्द करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. याखेरीज आरटीओ या चारही कारची नोंदणी रद्द करणार आहे. या प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे समजते.

अमन सिंग (२०), कामीन अन्सारी (वय २०), अंकित माहुले (१९) व सोहेल खान (वय २५) अशी या स्टंटबाज युवकांची नावे आहेत. २६ जानेवारीला या चौघांनी वंजारीनगर परिसरातील नवीन उड्डाणपुलावर भरधाव व आडव्या-तिडव्या पद्धतीने कार चालवीत स्टंटबाजी केली. ते पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनाही धडकी भरली. काही नागरिकांनी या स्टंटबाजीचे चित्रीकरण केले. त्यांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कारचालकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तसेच वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांना युवकांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारमालकांचा शोध घेतला. चार कारचालकांना वाहतूक शाखेत बोलाविले. पालकांसमोरच पोलिसांनी युवकांना फटकारले. पोलिसांनी कार जप्त करून युवकांकडून प्रत्येकी ४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतर आता आरटीओनेसुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव म्हणाले, ‘या सर्व युवकांना त्यांचे परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत अशी कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक परिवहन विभागाने बजावली आहे. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी या युवकांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच आम्ही या चारही वाहनांची नोंदणीच रद्द करणार आहोत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here