मुंबई :आशिया आणि अमेरिकेतील शेअर बाजारांच्या तेजीचे सुपरिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आले. गुंतवणूकदारांच्या खरेदीने बुधवारी सकाळी सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ झाली. निफ्टी १०० अंकांनी वधारला.

चीनमधील करोना व्हायरसच्या दहशतीमुळे मागील काही दिवस जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड सुरु होती. मात्र अमेरिकेतील अॅपल कंपनीने चांगली कामिगिरी केली आहे. यामुळे जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. अॅपलची कामगिरी ही अमेरिकन अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत आहे. या कारणांनी गुंतवणूकदार पुन्हा बाजाराकडे वळाले, असे शेअर दलालांनी सांगितले.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने १०० अंकांची झेप घेतली होती. मेटल, टेलिकॉम, इन्फ्रा, ऑटो, एनर्जी, आयटी या क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला. येत्या शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत
सादर करणार आहेत. सरकारची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. विकासदर सहा वर्षांच्या नीचांकावर आला आहे. त्यामुळे सरकार या गोष्टींचे ‘बजेट’मध्ये कशा प्रकारे नियोजन करते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पात सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार गुंतवणूकवृद्धीसाठी घोषणा करेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे. परिणामी शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरु आहे. बाजारात टाटा स्टील, हिरोमोटो कॉर्प, बजाज फायनान्स, इन्फोसिस, सनफार्मा, कोटक बँक, एनटीपीसी, मारुती, बजाज ऑटो हे शेअर तेजीत आहेत.

मंगळवारी मुंबई शेअर बाजारातील घसरण झाली. सेन्सेक्स १८८ अंकांनी घसरला आणि ४० हजार ९६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६३ अंकांची घसरण झाली. निफ्टी १२०५५ अंकावर स्थिरावला. सोमवारी सेन्सेक्स ४५८ अंकांनी घसरला होता तर निफ्टीत १२९ अंकांची घसरण झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here