वाचा:
उपमुख्यमंत्री पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.
वाचा:
पवार म्हणाले, ‘करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.
वाचा:
या सभेत पवार यांनी राजकीय टोलेबाजीही केली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा नाव न घेता त्यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘नगर आणि पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. पुण्याचे दहा तर नगरने सात आमदार दिले. अकोल्यात ऐनवेळी पक्षाला सोडून गेलेल्यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीला सोडलेल्यांची अशीच अवस्था होते. नगर जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार तरुण आहेत. त्यातच राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माझ्याकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा. नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. आता त्यांचे हित जोपासणे आमची जबाबदारी आहे,’ असेही पवार म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times