मुंबई : सलग पाच सत्रात घसरण अनुभवणाऱ्या सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली. आज शनिवारी सोने १५० रुपयांनी वधारले आहे. काल मुंबई सराफा बाजारात सोने ४०७ रुपयांनी वधारले होते आणि प्रती १० ग्रॅम ४९३९३ रुपयांवर गेले.

देशांतर्गत कमॉडिटी बाजारात गुरुवारी सोने ४९००० खाली गेले होते. मात्र शुक्रवारी त्यात खरेदी दिसून आली. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती ४९२७० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यात ३४० रुपयांची वाढ झाली. एक किलो ७०१४८ रुपये झाला असून त्यात २५५३ रुपयांची वाढ झाली होती.

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डने २० डॉलरची वाढ नोंदवली. सोन्याचा भाव १८६३.०३ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव २६.१८ डॉलर प्रती औंस झाला. गुंतवणूकदारांनी दीर्घ काळ प्रतिक्षा केलेल्या अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेजमुळे महागाई वाढू शकते. यामुळे मौल्यवान धातूची मागणी वाढू शकते, महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या स्थितीत सोने तारक ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान good returns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९५० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९५० रुपये झाला आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत १५० रुपयांची वाढ झाली. मुंबई आज एक किलो चांदीचा भाव ७०००० रुपये आहे. त्यात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव ६९२०० रुपये होता.

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२३०० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६५५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०७७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१०२० रुपये आहे.

करोनाने निर्माण झालेल्या अनिश्चित २०२० मध्ये सोने २८ टक्क्यांनी वाढले होते. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. केवळ भारतात सोने वाढले असे नाही तर जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत या काळात २३ टक्के वाढ झाली होती. सोमवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात सोन्यावरील शुक्ल कपातीची मागणी सराफ व्यवसायिकांकडून करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here