मुंबई: नेहमीच हॉट फोटोशूट आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री काही दिवसांपासून मात्र तिचा आगमी चित्रपट ‘एक व्हिलन २’मुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दिशा या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात ती जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. मागच्या काही दिवसांपासून दिशा जिममध्ये घाम गाळत आहे. ती अनेकदा तिच्या वर्काउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता ती या चित्रपटासाठी स्वतःवर विशेष मेहनत घेताना दिसत आहे.

दिशा काही दिवसांपासून या चित्रपटाशी संबंधित वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये सहभागी होत आहे. याशिवाय ती या चित्रपटासाठी एक रिडिंग सेशन सुद्धा घेणार असल्याचं समजतं. ज्यामुळे तिला या चित्रपटातील भूमिका आणखी चांगल्या पद्धतीनं साकारण्यास मदत होईल.

लॉकडाऊनच्या काळातही दिशा तिचं अभिनय कौशल्य अधिक चांगलं करण्यासाठी मेहनत करताना दिसली होती. यासाठी तिनं ऑनलाइन प्रशिक्षणही घेतलं आहे. दिशाला या ‘एक व्हिलन २’चे दिग्दर्शक मोहित सूरी यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे. याआधी दिशानं मोहित सूरी यांच्या ‘मलंग’ चित्रपटात काम केलं होतं. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता.

‘एक व्हिलन २’बद्दल बोलताना मोहित सूरी सांगतात, ‘या चित्रपटात दोन व्हिलन एकमेकांशी दोन हात करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही खलनायकाच्या भूमिकेत असणार आहेत. याशिवाय या चित्रपटाच्या अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात दोन अभिनेत्री असणार आहेत. यापैकी एक खलनायकी भूमिकेत दिसेल. तर दुसऱ्या अभिनेत्रीसाठी मी एक चांगल्या चेहऱ्याच्या शोधात आहे.’

दिशा पाटनीच्या ‘एक व्हिलन २’चं शूटिंग लवकरच सुरू होणार असून या व्यतिरिक्त ती सलमान खानच्या ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here