मुंबई : उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होणार असून १ तारखेपासून काही बदल होणार आहेत. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तर रेलवे सेवा, विमान सेवा, एटीएम आणि घरगुती गॅस सिलिंडर याबाबत लागू होणार आहेत. एक फेब्रुवारीपासून सहा नियम बदलणार आहेत. ज्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल. नव्या बदलांनी दिलासा मिळणार असला तरी या बदलांनाअनुसरून निर्णय घेतले नाही तर आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

अर्थसंकल्प सादर होणार
दिल्लीत शुक्रवारपासून संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु झाले आहे. १ फेब्रुवारी म्हणजेच उद्या सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेपुढे सादर करतील. यंदा पहिल्यांदाच बजेटची छपाई करण्यात आलेली नाही. बजेट पेपरलेस असणार आहे. या बजेटमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षभर करोनाने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार नोकरदार वर्गाला कर सवलत देण्याची शक्यता आहे.

पीएनबी बँकेच्या ग्राहकांसाठी एटीएम बाबत महत्वाचा बदल होणार
पंजाब अँड नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी उद्या १ फेब्रुवारीपासून महत्वाचा बदल होणार आहे. आर्थिक फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. उद्यापासून पीएनबी ग्राहक नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहार करू शकणार नाहीत. यापूर्वीच बँकेने याबाबत ग्राहकांना कळवले होते. नॉन ईएमव्ही एटीएममधून पीएनबीचे ग्राहक सोमवारपासून पैसे काढून शकणार नाहीत.

महागण्याची शक्यता पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील इंधन दर आणि आयात खर्च यानुसार देशांतर्गत इंधनाचा दर कंपन्या निश्चित करतात. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी इंधन दर वाढवले होते. त्यामुळे १ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

तब्बल १० महिन्यांनंतर रेल्वेकडून खानपान सेवा करोना संकट आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे भारतीय रेल्वेने ई-कॅटरिंग अर्थात खानपान सेवा बंद केली होती. ती आता १० महिन्यांनंतर सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीपासून ई कॅटरिंग सेवा सुरु होणार असल्याचे रेल्वेने म्हटलं आहे. सुरुवातीला निवडक प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर ही सेवा सुरु केली जाणार आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सेवांचा विस्तार सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सेवा विस्ताराची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते २७ मार्च या दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज उड्डाण घेणार आहे. त्याशिवाय कुवेत, विजयवाडा, हैद्राबाद, मंगलोर, कोझीकोड, कुन्नूर, कोची या सेवांचा समावेश केला जाणार आहे.

ओटीपी आणि आयरिसनुसार मिळणार रेशन रेशन घेणाऱ्यांसाठी आता आपला नोंदणीकृत मोबाइल सोबत ठेवावा लागणार आहे. कारण उद्यापासून अन्नपूर्णा आणि अंत्योदय कार्डधारकांना बायोमेट्रिकनुसार रेशन दिले जात होते. यात उद्यापासून बदल होणार आहे. नव्या नियमावलीनुसार मोबाइल ओटीपी आणि आयरिस कोड रेशन घेण्यासाठी आवश्यक असेल. तेलंगणा राज्यात ही नवीन पद्धत लागू केली जाणार आहे. सध्या करोना संकटामुळे सरकारने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बंद केले आहे. रेशन प्राप्त करण्यासाठी कार्डधारकांनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here