अजित पवार अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते यांनी सरकारमधून बाहेर पडण्याविषयी जे वक्तव्य केलं, त्यावर अजित पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर ते म्हणाले, ‘बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही. राज्याच्या हितासाठी आम्ही किमान समान कार्यक्रमावर काम करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही.’
अशोक चव्हाण काय म्हणाले
?
‘राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे,’ असं अशोक चव्हाण म्हणाले होते.
नवाब मलिकांकडूनही टीका
अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीची असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही म्हटलं होतं. ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतलेले नाही. तिन्ही पक्षांनी म्हणजेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मिळून किमान समान कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कालची बोलण्याची पद्धत चुकली आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times