मुंबई : कमॉडिटी बाजारात आज सोमवारी सोन्यामध्ये मोठी घसरण झुलाय आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीने आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने जवळपास २००० रुपयांनी घसरले. तर चांदीच्या किमती मोठी उसळी दिसून आली. आज चांदीचा भाव ४००० रुपयांनी वधारला.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली. यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव १३२४ रुपयांनी कमी झाला. सोने प्रती १० ग्रॅम ४७५२० रुपयांपर्यंत खाली आले. याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव ४८८४४ रुपये होता.

सोने स्वस्त होत असले तरी दुसऱ्या बाजूला चांदीमध्ये मात्र मोठी मागणी आहे. गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिक तसेच औद्योगिक क्षेत्रातून चांदीला मागणी आहे. आज चांदीमध्ये ३४६१ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव एक किलोला ७२४७० रुपये इतका वाढला आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८६५० रुपये आहे. त्यात ६८७ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी सोने ४७२०१ रुपयांपर्यंत खाली गेले होते. एक किलो चांदीचा भाव ७३९०१ रुपये असून त्यात ४१९५ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी चांदीने ७४४२६ रुपयांपर्यंत मजल मारली होती.

अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्यात आले आहे. या घोषणेचा मोठा फटका सोन्याला बसला आहे. गुंतवणूकदारांनी सोन्याची जोरदार विक्री करून गुंतवणूक काढून घेण्याला प्राधान्य दिल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमॉडिटी तज्ज्ञ नवनीत दमाणी यांनी सांगितले.

दरम्यान good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४५० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४५० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८१५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२२७० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६२५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०४५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०७०० रुपये आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here