आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेचे करोना संकटामुळं अक्षरश: कंबरडे मोडले आहे. यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत पालिकेच्या उत्पन्नात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली आहे. करोना संकटाच्या काळात पालिकेचा सर्वाधिक खर्च आरोग्य सुविधेवर आहे. त्याचबरोबर, आर्थिक मंदीने मागील वर्षभर पालिकेला सतावले असून, त्यामुळे पैशांअभावी कोणतेही मोठे प्रकल्प पालिकेने हाती घेतलेले नाहीत.
मागील वर्ष करोना संकटांशी दोन हात करण्यात गेलं. यावेळी २०२०- २१ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींच्या तुलनेत आतापर्यंत २५ ते ३० टक्के महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. एकूणच यंदा पालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळं नवीन वर्षात मुंबईकरांवर अतिरिक्त कराचे ओझे लादले जाणार की करवाढ टाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचाः
आरोग्य सेवा-सुविधांसाठी बजेटमध्ये तरतूद करणार ?
वर्षाच्या सुरुवातीला करोनाचं संकट येऊन उभं राहिलं. या संकटाचा सामना करताना पालिकेला आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च करावा लागला होता. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा- सुविधांसाठी काही नवीन योजना सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१- २२च्या अर्थसंकल्पात पालिकेनं आरोग्य सुविधांसाठी मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३ टक्के वाढ केली आहे. २०१९- २०च्या अर्थसंकल्पात आरोग्या सुविधांसाठी ४ हजार १५१ कोटींची तरतूद केली होती. तर, या अर्थसंकल्पात ही रक्कम ४ हजार २६० कोटीपर्यंत वाढवली आहे.
कोव्हिड-१९ च्या संकटामुळे सार्वजनिक आरोग्यचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रालाही महत्व दिले जाण्याची शक्यता आहे. करोना संकटाशी दोन हात करताना पालिकेचे जवळपास १६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाचाः
मालमत्ता करात वाढ होणार का?
बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे बिल्डरांकडून येणाऱ्या विकासशुल्कात घट झाली आहे. मालमत्ता करवसुलीतदेखील मोठी घसरण झाली आहे. राज्य सरकारने ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना मालमत्ता करआकारणी करणार नाही, असा निर्णय आधीच झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर त्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा अशी मागणी करण्यात येत आहे.
विकास कामांचं काय होणार?
आर्थिक मंदी व पैशांअभावी कोणतेही मोठे प्रकल्प पालिकेने हाती घेतलेले नाहीत. कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, मलनि:सारण प्रकल्प या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी राखीव ठेवला आहे. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात विकास कामांसाठी काय तरतूद केली जाईल हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. पूरमुक्तीसाठी भूमिगत टाक्या, माहुल आणि मोगरा ही नवी पंपिंग स्टेशन्स, मिठी नदी सौंदर्यीकरण, मिठी नदीचे सौंदर्यीकरण-बोटिंग, नद्यांचे पुनरुज्जीवन, यासाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times