म. टा. प्रतिनिधी, : शहराजवळील झाल्टा फाटा ते कॅम्ब्रिज शाळेच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षातून तब्बल एक क्विंटल ११ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही धडक कारवाई केली. जप्त गांजाची किंमत २२ लाख ३२ हजार रूपये इतकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहरात नशेसाठी गांजाची मोठी खेप येत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राहुल रोडे यांच्यासह पोलीस अंमलदार सय्यद शकील, इम्रान पठाण, ए.आर. खरात, मनोज विखनकर, विजय निकम, व्हि.जे. आढे यांनी १ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान या पथकाने कॅम्ब्रिज शाळेच्या चौकात क्रमांक नसलेली मोपेड आणि रिक्षा अडवली. या वाहनांची झडती घेतली. त्यात एका बॅगमध्ये १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत बाजारात २२ लाख ३४ हजार रूपये इतकी आहे.

या प्रकरणी बख्तीयार खान जहाँगिर खान उर्फ राजा (३६, रा किराडपूरा, शरिफ कॉलनी), शेख शाहरूख शेख समद (२३, रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी) आणि शेख शोएब शेख मुनीर (२०, रा. रहेमानिया कॉलनी) असे अटक झालेल्यांची नावे आहेत. या आरोपींकडून एक मोपेड, एका रिक्षासह तीन मोबाइल असा एकूण २५ लाख ८२ हजार ४८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकाची धडक कारवाई

शहर पोलीस आयुक्तपदावर रूजू झाल्यानंतर डॉ. निखील गुप्ता यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले होते. या विशेष पोलीस पथकाने कारवाईची सुरवात अंमली पदार्थाची मुंबईहून होत असलेल्या तस्करीपासून सुरू केली. टँकरमधून अवैधरित्या पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश या पथकाने केला. तसेच अवैधरित्या गावठी बंदूक विक्री करणाऱ्यांनाही अटक केली होती. तसेच आयपीएल सट्टा तसेच अन्य कारवायाही या पथकाने केल्या आहेत.

गुन्हे शाखेवर केली मात

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाया बघता, शहर गुन्हे शाखेलाही मागे टाकल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेची कारवाई सरासरी आहे. अन्य पोलीस ठाण्याला गुन्ह्यांची उकल करण्यास मदत करणे याहून अधिक काम आता गुन्हे शाखेकडे नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here