म. टा. खास प्रतिनिधी

मुंबई : सण, उत्सव, सेलिब्रेशन अशा मोक्याच्या संधी सायबर भामटे सावज जाळ्यात अडकविण्यासाठी शोधतच असतात. आता या भामट्यांना निमित्त मिळाले आहे, ते काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’चे. ताज हॉटेलच्या वतीने खास ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मोफत गिफ्ट दिले जात असल्याचा संदेश सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा संदेश बोगस असून कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हॅलेंटाइन डेनिमित्त फ्री गिफ्ट कार्ड आणि फ्री कूपन मिळत असल्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ताज हॉटेलमध्ये राहण्यास फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याचा संदेश सर्वाधिक पसरला आहे. या संदेश व्हायरल होत असल्याचे समजताच ताज हॉटेलच्या वतीने अशी कोणतीच योजना अथवा गिफ्ट कार्ड देत नसल्याचे पोलिसांना कळविण्यात आले. त्यामुळे सायबर पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सर्वसामान्य नागरिकांना केले आहे. व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून कोणत्याही मोफत गिफ्टचे आमिष दाखवून एखादा संदेश आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करून स्वतःची माहिती भरू नये. तसेच यासंदर्भात कुणी अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याला बँक खात्याचा तपशील किंवा अन्य कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हाच तो संदेश

‘मला ताज हॉटेलमधून मोफत गिफ्ट मिळाले असून, सात दिवस हॉटेलात मोफत राहण्याची संधी मिळाली. व्हॅलेंटाइन दिवसासाठी खास ऑफर आपल्यालाही मिळू शकते. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…’

अशी घ्या काळजी

संदेशातील कोणत्याही लिंकवर क्लिक करून स्वतःची माहिती देऊ नका. अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याला बँक खात्याचा तपशील किंवा अन्य कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here