आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षात नव्या शिलेदारांची नियुक्ती करतानाच पक्षांतरामुळं पडलेली खिंडारं ताबडतोब बुजवण्यावरही लक्ष केंद्रित केलं आहे. यावर कार्यकर्त्यांना उद्देशून बाळा नांदगावर यांनी एक पोस्ट लिहली आहे. तसंच, आमदार राजू पाटील यांचं भरभरुन कौतुकही केलं आहे.
कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना हि कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठे पक्षांतर अनुभवले आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर श्रद्धा ठेवून कायमच कार्यरत असतो, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.
वाचाः
स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही, तसेच जनता सगळे जाणून आहे व आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे, आमचा एक आहे पण “नेक” आहे, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांची पाठ थोपटली आहे.
वाचाः
कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती की अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times