जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर दौलत नगरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हे लोखंडी सामान विक्री करणारे व्यापारी पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर पार्किंग आहे. वर दोन मजले आहेत. आज पहाटे तीन-सव्वातीनच्या सुमारास इटकरे कुटुंबीय गाढ झोपेत असताना, सहा दरोडेखोरांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. दरोडेखोरांनी चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांनी इटकरेंची पत्नी मनिषा यांचे तोंड दाबले. तर पिंटू इटकरे यांना चाकूचा धाक दाखवून घरातील किंमती वस्तू देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील ३ लाखांची रोकड आणि २० लाखांचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले. मुद्देमाल घेतल्यानंतर इटकरे यांना धमकावत हे सहाही दरोडेखोर पळून गेले.
या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी चेहरे कापडाने झाकले होते. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वातीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करताना त्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाइल घेऊन तो खाली फेकून दिला.
या घटनेनंतर भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने दिवस उजडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर रामानंदनगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. इटकरे दाम्पत्याचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times