परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. टिळेकरनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एकूण २९ गुन्हे दाखल आहेत. त्याने पुण्यात अशा पद्धतीने कोणाला धमकाविले अथवा फसविले आहे का, याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी दिली. पनवेल येथील बांधकाम व्यवसायिक नंदू वाझेकर व आदित्य दाढे यांची पुण्यात मार्केटयार्ड परिसरात चार एकर जागा आहे. या जागेची आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून कुख्यात अश्विन नाईककडे गेला. त्यावेळी वाझेकर यांनी त्यांची कागदपत्रे दाखविली. त्यामुळे नाईकने त्याला हाकलून दिले. त्यानंतर आरोपी ठक्कर हा सुरेश शिंदे याच्याकडे गेला. शिंदेने छोटा राजनला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर वाझेकर यांना फोनवर छोटा राजनने २६ कोटी रूपयांची मागणी करून प्रकरण मिटवितो म्हणाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये ठक्कर, छोटा राजन, सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात आरोपींना कोर्टाने दोन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. ठक्कर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकला तो कोंढव्यातील थ्री ज्वेल्स कोलते पोटील येथे भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठक्कर याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्या ठिकाणी पत्नीसोबत तो राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन मुंबई सीबीआयच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. देशात छोटा राजनच्या विरोधात दाखल असलेले सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयने त्यांच्याकडे घेतला होता. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे आहे. त्यामुळे आरोपी ठक्कर याला देखील मुंबईत सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times