यवतमाळ: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध म्हणून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला यवतमाळमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या बंदवेळी दुकान बंद करण्यासाठी आलेल्या काही तरुणांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. दुकान बंद करण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर एका महिलेने लाल मिरचीची पावडर फेकून त्यांना पळवून लावले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे लोकही अवाक् झाले.

बहुजन क्रांती मोर्चाने आज भारत बंदची हाक दिलेली आहे. महाराष्ट्रात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागले आहे. पुण्यात २५० आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. यवतमाळमध्येही महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटले. यवतमाळच्या बाजारपेठेत काही आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले होते. यावेळी आंदोलकांची एका दुकानदार महिलेशी वादावादी झाली आणि शाब्दिक चकमक वाढतच गेली. त्याचवेळी काही आंदोलकांनी जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या या महिलेने या आंदोलकांच्या तोंडावर मिरची पावडरच फेकून मारली. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यामुळे हे भांडण पाहण्यासाठी जमलेल्या जमावालाही अचानक झालेल्या या प्रकारामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, भारत बंदचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पडसाद उमटले आहेत. राजधानी दिल्लीतील शाहीनबाग येथे महिलांनी रस्त्यावर उतरून भारत बंदला पाठिंबा देत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला जोरदार विरोध केला. बिहारच्या सीतामढीत दरम्यान दोन गटांत हाणामारी झाली. त्यात १५ जण जखमी झाले. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथेही दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुर्शिदाबाद येथे तणाव असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here