हॅमिल्टन: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारली असली तरी प्रत्यक्षात मात्र टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला हा सामना जिंकू असं वाटत नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन मैदानात तग धरून होता. त्यामुळे एक क्षण असा आला की हा सामना जिंकू असं वाटत नव्हतं, असं विराट कोहलीने सांगितलं.

आजच्या रोमहर्षक आणि ऐतिहासिक विजयानंतर पुरस्कार घेतल्यावर विराट कोहलीने ही कबुली दिली. केन विल्यम्सनने शानदार ९५ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना जिंकता येणार नाही, असं मला वाटलं होतं. न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर विल्यम्सनबद्दल मला वाईट वाटलं. कारण एवढी मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारल्यानंतर सामना गमवावा लागतो तेव्हा काय वेदना होतात हे मला माहीत आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल फार वाईट वाटलं, असं विराट म्हणाला.

शेवटच्या चेंडूवर विजयासाठी न्यूझीलंडला केवळ एकच धाव हवी होती. पण मोहम्मद शमीने टिच्चून गोलंदाजी करत रॉस टेलरला तंबूत पाठवलं. त्यावरही विराटने भाष्य केलं. शमी शेवटचा चेंडू टाकणार होता. त्यावेळी आमची चर्चा झाली. यावेळी आम्ही स्टंम्प्सलाच टार्गेट करण्याचा निर्णय घेतला. कारण तसं केलं नसतं तर एक धाव सहज निघाली असती, असंही त्यानं सांगितलं. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ५-०नेच जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सांगतानाच उरलेले दोन्ही सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असून या सामन्यांमध्ये दुसऱ्या खेळाडूंनाही संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही तो म्हणाला.

हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात सुपरओव्हरमध्ये रोहित शर्मानं तडकावलेल्या सलग दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडवर ‘सुपरहिट’ विजय मिळवला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडनं भारताला १८ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्मानं लागोपाठ दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं मालिकाही खिशात घातली आहे. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर भारताने ही कमाल केली आहे.

स्कोअरकार्ड

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here