म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ राहवे यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘मॉर्निंग वॉकर्स’साठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या अभिनव योजनेमुळे ठाणेकरांना मॉर्निग वॉक करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळात होणार्‍या सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. उद्यापासून या उप्रकमाला सुरुवात होत आहे.

रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्ग ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतु, त्यातून केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीसुद्धा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूप घेत आहे. केवळ मॉर्निग वॉकसाठी काही रस्ते आरक्षित असावे यासाठी सहपोलिस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सर्व्हिस रोड, उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्रमांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी करण्यात आली आहे.

सकाळी पाच ते सात या वेळात या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. या रस्त्यांवर केवळ मॉर्निग वॉकर्स, जॉगर्स, योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणा-यांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. याबाबत वाहतूक विभागाकडून अधिसूचना जारी केली असून ही अधिसूचना ३० दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे. याबाबत काही सूचना, आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना कायमस्वरूपी अंमलात आणण्यात येणार आहे.

मॉर्निग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याचे प्रकार होतात. त्यांना रोखण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून वॉक करणे महिलांना थोडे असुरक्षित वाटते. परंतु, आता या तीन रस्त्यांवर सकाळी कोणत्याही वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, वॉक करताना या रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्रमामुळे मॉर्निग वॉक करणा-यांच्या संख्येत निश्चित भर पडेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, ठाणेकरांना पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय लागावी, यासाठी वाहतुकीचे निर्बंध ५ ते ७ पर्यंतच ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here