ठाणे: फेसबुकवर दुसऱ्याच नावाने बनावट अकाऊंट तयार करून महिलांशी मैत्री करत ‘मॉडेल’ असल्याचे सांगणारा तसेच इतर खोटी कारणे देऊन महिलांची फसवणूक करणारा उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील याला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने नवी मुंबईतून अटक केले आहे. त्याने मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, पुणे, अमरावती, सातारा, रत्नागिरी येथील अनेक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ( Update )

वाचा:

कल्याणमधील एका गृहिणीची ३ लाख १९ हजाराची फसवणूक झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्याने शुभम पाटील या नावाने बनावट अकाऊंटचा वापर केला होता. या महिलेला खोटी कारणे सांगितली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या मालमत्ता गुन्हे शोध कक्षातील पोलीस कर्मचारी यांनी शुभम पाटील या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरील मोबाइल नंबरद्वारे चौकशी केली असता, हा नंबर नवी मुंबईतील सतीश मोरे याचा असल्याची बाब समोर आली. त्यानुसार तात्काळ पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतील स्टेशन परिसरात फिरत असताना सतीशच्या मुसक्या आवळल्या.

सतीशच्या चौकशीत त्याने कल्याणमधील गृहिणीची फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुभम पाटील तसेच सोनू पाटील अशा नावांनी बनावट फेसबुक अकाऊंट तयार करत तो महिलांशी मैत्री करत असे. त्यानंतर महिलांचे मोबाइल नंबर प्राप्त करत तो महिलांशी संवाद साधायचा. शिवाय महिलांना विविध खोटी कारणे देत तसेच मॉडेल असल्याचे सांगून आमिष दाखवत त्याने राज्यातील अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या आरोपीला अटक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या पथकाने केली.

घणसोली येथील दत्तनगरमध्ये राहणारा सतीश सध्या बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाने त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, आरोपीने किती महिलांची फसवणूक केली याबाबत चौकशी सुरु असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here