म. टा. प्रतिनिधी, मुंबई

रेल्वे रुळांशेजारील जमिनींवर सांडपाण्यातून भाजी पिकवून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अशा जमिनींवर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. फुलांची शेती करू इच्छिणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत आणि मार्गदर्शन ही करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण-कसारा-कर्जत मार्ग असो वा हार्बर आणि ट्रान्स हार्बर… सर्वच रेल्वे रुळांच्या शेजारी रेल्वे जमिनींवर तसेच पालिका जमिनींवर मोठ्या प्रमाणात भाजीचे मळे पिकवले जातात. सांडपाणी मिश्रित आणि अस्वच्छ पाण्यावर या भाज्या पिकवल्या जातात. रेल्वेविषयक कामांचा आढावा आणि प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनीही रेल्वे जमिनींवर फुलांची शेती करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाला दिला.

‘ग्रो मोअर फूड’ योजनेंतर्गत फुलांची शेती करण्याचा पर्याय रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. फुलांची शेती कशी करावी, त्याची निगा कशी राखावी, त्याची विक्री कुठे करावी, याबाबत माहिती दिली जाणार आहे. रुळांशेजारील रेल्वे हद्दीतील जमिनींवरच ही योजना लागू असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेवरील विविध तुकड्यात विभागलेल्या सुमारे १०० एकरपेक्षा जास्त जमिनी रुळांच्या शेजारी आहे. रेल्वे जमिनींवर कब्जा होऊ नये, यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जमिनीची निगा राखण्यासाठी ही जमीन देण्यात येते. सांडपाणीयुक्त पाण्यावर उत्पादन घेतल्यास संबंधिताचे लायसन्स रद्द करण्याची तरतूद नियमांत असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.

रुळांच्या शेजारील रेल्वे हद्दीतील जमिनांवर फुलांची शेती करण्याचा पर्याय संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मदत व मार्गदर्शन करण्यात येईल.

-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here