म. टा. प्रतिनिधी, जळगाव: ‘राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना जनतेच्या प्रश्नांची देणेघेणे राहीलेले नाही. या सरकारमध्येत एकमत नाही. हे सरकार संधीसाधू आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली अनेक आश्वासने हवेत विरली आहेत,’ अशा शब्दात भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाआघाडी सरकारवर टीका केली.

जामनेर येथे महावितरण विरोधात मोर्चा काढून आमदार महाजन यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका कली. वाढीव वीज बिले, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तसेच इतर कारणांमुळे महावितरण कंपनीच्या विरोधात आज भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आले. जामनेर शहरातील नगरपालिका चौकापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुकाभरातील शेतकऱ्यांसह भाजपचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले

यावेळी बोलताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ‘महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. घरेदारे विकली तरीदेखील ही बिले शेतकरी भरू शकणार नाही. अशी परिस्थिती आहे. परंतु तरीदेखील सरकार पुढाकार घ्यायला तयार नाही. आज रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. ट्रांसफार्मर जळाला तर तो बदलून मिळत नाही. एकंदरीतच सरकारचे उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. राज्यात कुणीही कुणाचे ऐकून घ्यायला तयार नाही,’ अशी परिस्थिती असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडी सरकार अपयशी

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी ते केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, आंदोलन करत आहेत. राज्याच्या सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक घोषणा दिल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळाली नाही. सरकारच्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या. सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले,’ असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

टाळे ठोकून आंदोलन

हा मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार तसेच महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलेली वाढीव वीज बिले रद्द करावीत, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा, ट्रान्सफार्मर त्वरित बदलून मिळावेत, अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने यावेळी देण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here