भाजच्या वतीने विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वाढीव आणि चुकीचे वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला. शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.
वाचा:
विखे म्हणाले, ‘करोना काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. पण या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिले पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली आहे. मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात, काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही. त्यामुळे या आघाडी सरकारमध्येच आता ऊर्जा राहिली नाही. शेतकऱ्यांना नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. वीज बिलाच्या संदर्भात गावात येऊन अधिकाऱ्यांनी सक्ती केली तर त्याचे विपरीत परिणाम होतील. त्यामुळे वेळीच ग्राहकांची बिले दुरुस्त करून देण्यात यावीत,’ अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.
वाचा:
यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून त्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सभापती नंदा तांबे यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली. शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times