वाचा:
नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अमित शहा प्रथमच कोकणात येत आहेत. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे’, अशा भावना व्यक्त करतच राणे यांनी याबाबत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची भक्कम साथ मिळाल्याने मी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलो. येथील जनतेचा मी नेहमीच ऋणी राहणार आहे. आपल्या जिल्ह्यासाठी सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचं आरोग्य ठणठणीत राहावं आणि जिल्ह्यात डॉक्टर घडावेत म्हणून मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं स्वप्न मी पाहिलं होतं. हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, असे सांगतानाच यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सहकार्य कसं लाभलं याबाबत राणे यांनी प्रथमच भाष्य केलं.
वाचा:
मेडिकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्याही काही परवानग्या आवश्यक असतात. हे करताना कोणत्या प्रकारची आडकाठी आली का?, असे विचारले असताना राणे यांनी अशी कोणतीही आडकाठी आली नसल्याचे सांगितले. केंद्र असेल वा राज्य सरकार असेल मेडिकल कॉलेजबाबत मला कुणीही आडकाठी केली नाही. उद्धव ठाकरे यांचं मला चांगलं सहकार्य मिळालं. मेडिकल कॉलेजची फाइल परवानगीसाठी राज्य सरकारकडे आली तेव्हा मी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला. तुमच्याकडे माझ्या कॉलेजची फाइल आली आहे. त्यावर सही करा, अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व फाइलवर सही केली. त्यासाठी मी त्यांचे आभारही मानले, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी राजकीय वा कौटुंबिक चर्चा झाली का, असे विचारले असता सगळेच संवाद मीडियाला सांगायचे नसतात, असे सांगत राणे यांनी प्रश्नाचे उत्तर टाळले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:
दरम्यान, मेडिकल कॉलेजला परवानगी हा पूर्णत: केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासाठी फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत राणे यांनी काही दिवसांपूर्वी अशा फोनबाबत इन्कार केला होता. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याबाबत केलेला दावा राणे यांनी फेटाळला होता. आज मात्र राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला होता, हे स्वत:हून सांगितले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात यानिमित्ताने का होईना संवाद सुरू झाला असून ही फार मोठी घडामोड मानली जात आहे.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times