यावर्षी आयपीएलचा लिलाव काही दिवसांमध्येच होणार आहे. आज आयपीएलच्या लिलावातील खेळाडूंचे नामांकन करण्याची अखेरची तारीख होती. त्यामुळे आज आयपीएलमध्ये लिलाव होणाऱ्या खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे. या लिलावात ८१३ भारतीय आणि २८३ परदेशी म्हणजेच एकूण १०९७ खेळाडूंचे नामांकन करण्यात आले आहे. या लिलावाच्या यादीत अर्जुनसह हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि एस. श्रीशांतबरोबर बऱ्याच अनुभवी भारतीय खेळाडूंची समावेश करण्यात आलेला आहे.
आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज (मूळ किंमत) यावेळी ठरवण्यात आली आहे. या किंमतीवरुन अर्जुनच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज ही २० लाख रुपये ठेवल्याचे समजते आहे. त्यामुळे अर्जुनवर या २० लाखांच्या वर लिलावात बोली लागू शकते. पण जर कोणताही संघ अर्जुनवर बोली लावण्यासाठी तयार दिसला नाही तर त्याला त्याच्या बेस प्राइजवरही एखादा संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतो.
आयपीएलचा लिलाव नेमका कुठे आणि कधी होणार याबाबत बीसीसीआयने आता अधिकृत माहिती दिलेली आहे. यावर्षी आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. या दिवशी सर्वं संघांचे मालक आणि अधिकारी या लिलावाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान द्यायचे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलच्या कोणत्या संघात कोणते खेळाडू असतील, हे स्पष्ट होऊ शकेल. यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावात बरेच नामांकित खेळाडू उपलब्ध होणार आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्ससारख्या संघांनी बऱ्याच नामांकित खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर लिलावात किती बोली लागते आणि ते कोणत्या संघात जातात, याचे चित्र १८ फेबुवारीला स्पष्ट होऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times