कोल्हापूर: सभासदांना तीन लाखाचे कर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री यांनी केली आणि सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. पण पाच वर्षापूर्वी जी बँक शंभर कोटीपेक्षा अधिक तोट्यात होती, तीच बँक १३५ कोटीपर्यंत नफ्यात आणण्याची किमया कशी झाली, हे मुश्रीफांनी सांगताच अनेकांचे डोळे उघडले. ( Update )

वाचा:

राज्यातील अनेक जिल्हा बँका आजही तोट्यात आहेत. राजकारणासाठी नेत्यांनी त्याचा वापर केल्याने अनेक बँकांवर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. पण अशा कठीण काळात कोल्हापूर जिल्हा बँकेने देशात सर्वाधिक कर्ज वाटताना बँकही नफ्यात आणली. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासाठी संचालकांचा जंगी सत्कार करण्यात आला. ना बँकेच्या गाड्यांचा वापर, ना मिटिंगचा भत्ता वा चहापान खर्च, परदैश दौऱ्याला ब्रेक, अनाठायी खर्चाला फाटा आणि काटकसरीचा कारभार हे धोरण संचालकांनी स्वीकारले. सर्वात महत्वाचं म्हणजे, संचालक मंडळाच्या कामकाजाला व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाची साथ लाभली. या बळावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढला गेला आणि सहा वर्षात बँकेचा ढोबळ नफा १३५ कोटीपर्यत पोहचला. हे सारं शक्य झालं ते सभासद शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे, असे नमूद करत हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या नफ्याचा सक्सेस मंत्र सभासदांसमोर उलगडला.

वाचा:

मुश्रीफ म्हणाले, ‘मे २०१५ मध्ये मी कार्यभार स्वीकारला तेव्हा बँकेचा संचित तोटा १०३ कोटीपेक्षा जास्त होता. एनपीएचे प्रमाण ८.१६ टक्के होते. व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण २.८९ टक्के होते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सीआरएआरचे प्रमाण नऊ टक्क्यापेक्षा कमी होते, ते अधिक करणे ही मोठी आव्हाने आमच्यासमोर होती. थकबाकी वसुलीसाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले. संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन थकबाकीदारांच्या दारात ‘ढोल-ताशा बजाओ’ आंदोलन केले. साऱ्यांच्या प्रयत्नाला दोन वर्षात यश आले. १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा घालवून बँक नफ्यात आली आणि आम्ही लाभांश देण्यास सुरुवात केली.’

२०१७-१८ मध्ये ४३ कोटी ९८ लाख रुपयांचा नफा मिळवून जिल्हा बँकेने राज्यात प्रथम क्रमांकाचा नावलौकिक मिळवला. शिवाय गेल्या तीन वर्षात अनुक्रमे ११ कोटी, १८ कोटी, वीस कोटी रुपये इनकम टॅक्स भरला आहे. आरबीआयने, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच बँकांना लाभांश वाटपास स्थगिती दिली आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे बारा टक्के पर्यंत लाभांश देण्यापर्यत मजल मारली आहे. लाभांश वाटपाचे १९ कोटी रुपये जमा आहेत. आरबीआयची मान्यता मिळाली की लाभांश वाटप करण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

वाचा:

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बिनव्याजी तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित करणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेताना एक पथ्य पाळा, ठेवी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेतच ठेवा. कर्ज जिल्हा बँकेतून आणि ठेवी अन्य बँकेत असा प्रकार सुरू आहे. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या ठेवीचे प्रमाण कमी आहे. त्या ठेवीचे प्रमाण वाढवा. पुढील वर्षापासून बिनव्याजी कर्जाची रक्कम पाच लाख रुपये असणार आहे. शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम ठेव म्हणून ठेवल्यास तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील. पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५०० रुपये जमा केले आहेत. आम्ही मात्र २००० रुपये देऊ, असे मुश्रीफ म्हणताच सभास्थळी एकच हंशा पिकला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here