म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः अवसायनातील संस्थेच्या जमिनीचे सरकारी मूल्यांकन करून देण्यासाठी वीस लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक रचनाकार गणेश हणमंत माने यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दोन महिन्यापूर्वी आयकर अधिकाऱ्यास दहा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही कारवाई ताजी असतानाच शुक्रवारी मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईची अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. ही संस्था सरकारने अवसायनात काढल्याने अवसायक यांनी सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली. त्यासाठी संस्थेच्या जमिनीचे सरकारी मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. मालमत्तेचे मूल्यांकन लवकर करून दाखला‍ मिळावा म्हणून तक्रारदार सहाय्यक रचनाकार गणेश माने यांना वेळोवेळी भेटले होते. २१ जानेवारी २०२१ रोजी मालमत्तेचे मूल्यांकन करून लवकरात लवकर दाखला देण्याची तक्रारदारने विनंती केली. तेव्हा श्री. माने यांनी मूल्यांकन करून दाखला द्यायचा असेल तर ४५ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.

२१ जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील श्री. माने याच्या लाच मागणीची पडताळणी पंच साक्षीदारांच्या समक्ष करण्यात आली. पडताळणीमध्ये मालमत्तेचे सरकारी मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी ४५ लाख रूपये लाचेची मागणी श्री. माने केली. त्याचा पहिला हप्ता म्हणून २० लाख रूपये घेऊन येण्यास सांगून राहिलेले २५ लाख रूपये दाखला देताना घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला असता तक्रारदार व गणेश माने हे दोघेजण कार्यालयातून बाहेर पडून आवारातील चहाच्या टपरीवर गेले व त्या ठिकाणी तक्रारदाराकडून वीस लाख रूपये लाच स्वीकारताना पथकाने पकडले. जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार पेालीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, चालक सुरज अपराध यांच्या पथकाने केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here