मोहम्मदाबादमधील करसिया गावामध्ये आरोपी सुभाष बाथम याचे घर आहे. दोन वर्षांपूर्वी सुभाषने आपल्या एका नातेवाईकाचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक १० वर्षाची मुलगीदेखील आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचे तिला कळाले. तिने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर देशी बनावटीची पिस्तूलने गोळीबार सुरू केला. त्याशिवाय त्याने बॉम्बफेक देखील केली. या बॉम्बफेकीत घराजवळील एक भिंत ढासळली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची आणखी कुमक घटनास्थळी दाखल झाली. आपण तुरुंगात असताना पत्नीसोबत गावातील काहींनी दुष्कर्म केले आहे. पोलिसांनी त्यांना समोर आणावे असे त्याने म्हटले.
पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला आहे. सायंकाळपर्यंत पोलिसांना ओलिसांची सुटका करण्यात अपयश आले. ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. आरोपी सुभाषने स्वत: घर बनवले आहे. त्याने मुलांना घरातील एका कोपऱ्यात लपवून ठेवले आहे. सुभाषने स्थानिक आमदाराला ही बोलवण्याची मागणी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times