वाचा:
नारायण राणे यांनी आपलं स्वप्न साकारत सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील पडवे-कसाल येथे सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे लाइफ टाइम मेडिकल कॉलेज उभारले आहे. या कॉलेजचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी राज्यात सत्तांतराची आवश्यकता अधोरेखित करत जोरदार टोलेबाजी केली. ‘मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. सरकार गतीमान आहे, असे कुठे दिसत नाही. प्रगत राहिलेला महाराष्ट्र आज सर्वच बाबतीत मागे चालला आहे. त्यामुळेच हे सरकार राज्यात राहू नये, अशी माझी मनापासून प्रार्थना आहे. अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यावे, अशी माझी इच्छा आहे’, असे राणे म्हणाले.
वाचा:
शेतकरी आंदोलन, हिंदुत्व यावरून यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केले. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे, पण मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा पेट्रोल वा डिझेलच्या किंमती वाढवत नाही. तेल कंपन्यांनी दर वाढवले की सरकारला त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हे माहिती असूनही शिवसेनेचा रडीगेम चालला आहे, असे राणे म्हणाले. शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे, असे सांगण्यात आले आणि जेव्हा रस्त्यावर उतरायची वेळ आली तेव्हा हे मातोश्रीतून बाहेर पडले नाहीत. यांची माणसं थेट गाझीपूरच्या सीमेवर पोहचली, असा टोला राणे यांनी लगावला. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागले. काहींची लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवण्यापर्यंत मजल गेली. मी म्हणेन असे कृत्य करणारे जे शेतकरी आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, असा निशाणाही राणे यांनी साधला.
वाचा:
शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो. बाळासाहेब एकदा बोलले की शब्द मागे घ्यायचे नाहीत पण बाळासाहेबांनंतर तसा एकही नेता शिवसेनेत उरला नाही. सध्या शिवसेनेत ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. सगळीकडे यांची धरसोड वृत्ती पाहायला मिळते, अशी तोफ राणे यांनी डागली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबत वैयक्तिक स्वार्थासाठी सौदा केला आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडी स्थापन झाली त्याचदिवशी उद्धव यांनी हिंदुत्व सोडले आहे. एकतर त्यांनी आजवर हिंदुत्वासाठी काहीही केलेले नाही आणि यापुढेही ते काही करू शकणार नाहीत, असेही राणे म्हणाले. कॉलेजच्या परवानगीसंदर्भात उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, असे पुन्हा एकदा स्पष्ट करताना मला त्रास देण्याची किंवा अडवण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही. मला एखादी परवानगी दिली नाही तर मी कोर्टात जाणार हे त्यांना माहीत आहे आणि कोर्टाचे नाव काढले की हे सरकार घाबरते, असेही राणे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
वाचा:
मुंबईतील गुजराती समाज मोदी आणि शहा यांच्याव्यतिरिक्त बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही, असा टोला हाणतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होणार व पुढचा महापौर भाजपचाच असणार असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. आता काहीही झाले तरी शिवसेनेसोबत जायचे नाही, असा सूर भाजपात असल्याचेही राणे यावेळी म्हणाले. यांची काँग्रेसला नंबर वन करण्याची इच्छा असली तरी काँग्रेस नंबर वन व्हायला किती वेळ लागेल हे कुणीच सांगू शकणार नाही, असा टोला लगावतानाच देशात आणि राज्यात भाजपच नंबर वन राहणार आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times