मुंबईः इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढ कमी व्हावी यासाठी विरोधीपक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. तर, राज्यातील इंधन दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करावा, असा सल्ला राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. इंधन दरवाढीवरुन राज्यात राजकारण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, २०१४च्या निवडणुकांचे उदाहरणही त्यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर भूमिका मांडताना दिसतात. यावेळीही रोहित पवारांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा भाजपचा दुटप्पीपणा, असं म्हणत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

‘२०१४ मध्ये भाजपाने सत्ता हातात घेतली तेंव्हा पेट्रोलवर ९.५ रु कर आकारला जात होता. आज हाच कर ३२.९० रु वर गेला. म्हणजेच त्यात तब्बल ३५०% नी वाढ झाली. डिझेलबाबत बघितलं तर २०१४ मध्ये केंद्र सरकार ३.५६ रु कर आकारात होतं, आज त्यात सुमारे ९००% वाढ झाली असून आज तो ३१.८० रु पर्यंत पोहचलाय. विशेष म्हणजे कच्या तेलाच्या किमती २०१४ तुलनेत आज निम्म्याने कमी झाल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मात्र दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत आहेत. या दरवाढीमुळं वाहतूक खर्चात वाढ होऊन महागाई भडकतेच पण दुचाकीवरून शहराच्या ठिकाणी दूध, भाजीपाला विक्रीसाठी जाणारे शेतकरी, रिक्षाचालक, टेम्पो चालक, मच्छिमार यांच्या व्यवसायावरही परिणाम होतो,’ असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढून महागाई प्रचंड वाढल्याचं आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या जाहिराती अजून जनता विसरली नाही. पण त्या फक्त दिशाभूल करण्यासाठीच केल्या होत्या हे आता पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या जनतेलाही कळलंय. त्यामुळं ‘जनता माफ नहीं करेगी’चं बुमरँग भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

‘जीएसटी कायद्यानंतर राज्यांच्या स्वतःच्या महसूलाच्या स्त्रोतांपैकी इंधनावरील एक्साइज हा महत्वाचा स्त्रोत आहे. कोरोना काळात राज्यांचा विशेषता महाराष्ट्राचा मोठा महसूल बुडाला. त्यात केंद्राचीही मदत नाही. एकीकडं नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सुविधा याचा खर्च भरमसाठ वाढला, तर दुसरीकडं जीएसटी भरपाई देताना कोरोनाचं कारण सांगून केंद्र सरकारने राज्यांचा विश्वासघात केला,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.

वाचाः

‘अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारला कर कमी करायला लावण्याऐवजी उलट राज्य सरकारने कर कमी करावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जातेय याला काय म्हणावं? अशी मागणी करणाऱ्यांना किमान जनाची नाही तर मनाची तरी वाटायला हवी. फक्त आपल्या केंद्रीय नेत्यांची आरती गाण्यासाठी आणि त्यांची मर्जी राखण्यासाठी आपण स्वतःच्या राज्याच्या होणाऱ्या अपरिमित नुकसानीकडं किती डोळेझाक करायची याचं तरी भान त्यांनी ठेवायला हवं,’ असं म्हणत रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here