चेन्नई, : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातच भारतीय संघाचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण इंग्लंडच्या ५७८ धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद २५७ अशी अवस्था आहे. त्यामुळे भारतीय संघावर फॉलोऑनचे संकट येऊ शकते, असे म्हटले जात आहे. भारताला जर फॉलोऑनचे संकट दूर सारायचे असेल तर त्यांना ३७८ धावा कराव्या लागतील. पण भारताचे हे तळाचे फलंदाज हे आव्हान पेलणार का, याची उत्सुकता चाहत्यांना चौथ्या दिवशी असेल. फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला १२१ धावांची गरज आहे.

इंग्लडने कालच्या ५५५ धावांवरुन आज खेळायला सुरुवात केली. इंग्लंडने त्यानंतर २३ धावांची भर घातली आणि त्यांनी पहिल्या डावात ५७८ अशी विशाल धावसंख्या उभारली. भारताकडून यावेळी आर. अश्विन आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या.

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात आश्वासक झाली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने यावेळी चौथ्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला बाद करत यजमानांना पहिला धक्का दिला. रोहितला यावेळी सहा धावाच करता आल्या. त्यानंतर आर्चरनेच भारताला दुसरा धक्का दिला. आर्चरने यावेळी भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले. गिलने यावेळी २९ धावा केल्या. गिल बाद झाल्यावर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. भारताचा कर्णधार विराट कोहलीला यावेळी टॉम बेसने ११ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर काही वेळातच बेसने अजिंक्य रहाणेलाही एका धावेवर असताना बाद केले. त्यामुळे भारताची १ बाद ४४ वरुन ४ बाद ७३ अशी अवस्था झाली होती.

भारतीय संघ आता लवकर सर्वबाद होईल, असे स्वप्न इंग्लंडचा संघ पाहत होता. पण चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी यावेळी पाचव्या विकेटसाठी ११९ धावांची दमदार भागीदारी रचली आणि संघाला तारले. पण भारताची ही स्थिरस्थावर झालेली जोडीदेखील बेसनेच संपुष्टात आणली. बेसने यावेळी पहिल्यांदा पुजाराला बाद केले, पुजाराने यावेळी ११ चौकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. पुजारा बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी ही पंतच्या खांद्यावर होती. पण पुजारा बाद झाल्यावर पंतला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही आणि त्याला आपले शतकही पूर्ण करता आले नाही. बेसनेच यावेळी पंतला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. पंतने यावेळी फक्त ८८ चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ९१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

पंत बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विन यांनी दिवसाची उर्वरीत षटके यशस्वीरीत्या खेळून काढली. सुंदर सध्या नाबाद ३३ धावांवर खेळत आहे, तर अश्विनने नाबाद ८ धावा केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here