मुंबई : अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोन्याच्या तेजीला ग्रहण लागले आहे. आर्थिक संकटात विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्यात आठवडाभरात २५०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोने विक्रमी पातळीपासून ९००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आयात शुल्क कपातीची घोषणा त्यानंतर झालेली नफावसुली, करोना लसीकरण, जागतिक अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत सोन्यासाठी मात्र अडथळे ठरत आहेत. सोने खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही योग्य वेळ असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याला १७७० डॉलरच्या जवळ चांगला सपोर्ट आहे. भारतात सोने ४६८०० रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज एसएमसी ग्लोबलच्या कमॉडिटी विश्लेषक वंदना भारती यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की जगभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने सुरु आहे. अर्थव्यवस्था सावरणे, लसीकरण मोहीम आणि पर्यायाने करोनाबाधितांच्या संख्येवर मिळालेलं नियंत्रण हे घटक नकारात्मक आहेत. बॉण्ड यिल्डमध्ये जोपर्यंत घसरण होत नाही तोवर सोन्याच्या तेजीसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४७२७० रुपयांवर बंद झाला. त्यात ५५५ रुपयांची वाढ झाली होती. एक किलो चांदीचा भाव ६८६७१ रुपयांवर स्थिरावला. त्यात १८५३ रुपयांची वाढ झाली.

good returns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१६० रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७१६० रुपये झाला आहे.पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१६० रुपये असून २४ कॅरेटसाठी ४७१६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०४१० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४७०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८७३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४९० रुपये आहे.

दरम्यान, सोन्यातील घसरण किरकोळ ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी घेऊन आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. करोनाचे संकट आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा झळाळी मिळाली होती. दरम्यान, आठवडाभरात सोने दरात मोठी घसरण झाल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे सोन्याची मागणी वाढेल, असा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. गोल्ड ईटीएफ, निर्यातदार आणि ग्राहकांमधून सोने मागणी वाढेल, असे मत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी व्यक्त केले. लग्न सराईचा हंगाम असल्याने सध्या सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले. सोने मागणी स्तर आता करोना पूर्व स्थितीवर गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२० मध्ये सोन्याच्या एकूण आयातीत मोठी घसरण झाली होती. लॉकडाउनमुळे बाजार ठप्प होते. यामुळे गेल्या वर्षात भारत ४४६ टन सोने आयात करण्यात आले. २०१९ मध्ये ६९०.४ टन सोने आयात करण्यात आले होते. सोन्याला ४७२०० रुपयांच्या स्तरावर सपोर्ट आहे. येत्या काही महिन्यात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून येईल, असे मत पृथ्वी फिनमार्टचे कमॉडिटी विश्लेषक मनोज कुमार जैन यांनी व्यक्त केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here