नवी दिल्ली : चार वर्षापूर्वी त्याने मृत्यूवर मात केली. तो पुन्हा परतेल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण मृत्यूच्या दाढेतून तो परतला आणि आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने विश्वविक्रम रचत संघाला विजयही मिळवून दिला. ही गोष्ट आहे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू कायले मेयर्सची…

चार वर्षापूर्वी मेयर्स हा एका वादळामध्ये सापडला होता. आयर्लंडच्या एका संघाबरोबर तो डॉमिनिका येथे सराव करण्यासाठी गेला होता. तिथे सराव करत असतानाच मारिया नावाचे वादळ धडकले होते. या वादळामध्ये त्याचा संपर्क सर्वांशी तुटला होता. घरी आई-वडिलांनादेखील आपला मुलगा जीवंत आहे की नाही, याबाबतच कोणतीच माहिती नव्हती. वादळ एवढे जबरदस्त होते की, काही दिवस त्याच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. पण अखेर या दिवसांमध्ये त्याने आपला जीव वाचवला आणि तो पुन्हा एकदा आपल्या घरी परतला. त्यानंतर चार वर्षांनी मेयर्सने क्रिकेट विश्वात अशी गोष्ट करुन दाखवली, जी आतापर्यंत कोणालाही जमलेली नाही.

आज वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना रंगला होता. या पहिल्या कसोटीत बांगलादेशने वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. पण त्यावेळी मेयर्सने तुफानी फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावत त्याने बरेच विश्वविक्रम मोडीत काढले आहेत.

मेयर्स हा जगातील असा एकमेव खेळाडू ठरला आहे की, ज्याने पदार्पण करताना चौथ्या डावात द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मेयर्सने यावेळी चौथ्या डावात द्विशतक झळकावले. मेयर्सने २० चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर २१० धावा केल्या. या द्विशतकाच्या जोरावर मेयर्सने वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. त्याबरोबर द्विशतक झळकावत संघाला विजय मिळवून देणारा तो वेस्ट इंडिजचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मेयर्सवर क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here