मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर व्हावं म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा पत्रव्यवहार झाला. त्यातून दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबीराची निश्चिती झाली. यात मार्गदर्शनपर विविध सात सत्रे घेण्याचे ठरले. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असे दोन दिवस हे शिबीर होत असून आज शिबीराचा पहिला दिवस होता. यात विद्यापीठाच्या एकूण तीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव आणि समकक्ष अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. शासनाशी पत्रव्यवहार, अंतर्गत टिपण्णी, परिपत्रक काढणे, विद्यापीठ कायदा आणि नियम, माहिती अधिकार व विधीमंडळातील प्रश्न हाताळणे, निर्णय क्षमता व नेतृत्व विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन व टीमवर्क, प्रशासन कुशलता, परस्पर संवाद कौशल्य या विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावरच राजीव सातव यांनी आक्षेप घेतला आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही भाजपची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्था आहे. त्यामुळे या संस्थेत शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे योग्य नाही, असे सातव यांनी नमूद केले आहे. यात राज्य सरकारने हस्तक्षेप करावा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या नात्याने उदय सामंत यांनी हे प्रशिक्षण तत्काळ थांबवावे, अशी मागणी सातव यांनी केली आहे. सातव यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनात झालेल्या पत्रव्यवहाराशी संबंधित ठळक कागदपत्रेही ट्विटरवर पोस्ट केली आहेत.
दरम्यान, सातव यांच्या मागणीवर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
शिक्षणात राजकारण येऊ नये
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक अनुभव नसताना विद्यापीठातील अधिकाऱ्यांना तिथे प्रशिक्षण देणे उचित नसल्याची तक्रार सातव यांनी उदय सामंत यांच्याकडे केली आहे. ही संस्था भाजपाच्या विचारधारेने चालणारी असल्याने शिक्षण क्षेत्रात राजकारण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण तातडीने बंद करावे, अशी मागणी सातव यांनी सामंत यांच्याकडे केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times